२ पहिली स्वारी - तोरणगडावर विजय
२ पहिली स्वारी - तोरणगडावर विजय
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इ.स. १६४७ मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले.महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला.
हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. महाराजांनी आग्ऱ्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इ. स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे.
Comments
Post a Comment